हे देणारे कुबेर कुठे गेले? - मंगेश तेंदुलकर (१/२)
असाधारण आणि असामान्य माणसं त्यांच्या वागण्या-वावरण्यातून इतरांना बरंच
मोलाचं असं काही देत असतात. त्यांच्याकडं पाहणाऱ्यांनासुद्धा बरंच काही
मिळवता येतं. क्वचित एखाद्या प्रसंगात काही क्षण ही लोकोत्तर माणसं
आपल्यासमोर येतात; पण आयुष्यभर लक्षात राहतात. न बोलतादेखील खूप काही
सांगून जातात.
पुण्यातला तेव्हाचा लकडी पूल आणि जोंधळे चौक यादरम्यान
(1941-42 च्या आसपास) माझ्या वडिलांचं पुस्तकांचं दुकान होतं. समोर रस्त्याच्या पलीकडं किराणा मालाचं एक मोठं दुकान होतं. घरी माझा व्रात्यपणा नियंत्रणाबाहेर जात असल्याकारणानं वडील मला दुकानात न्यायचे. संध्याकाळचा साडेपाचचा सुमार. समोर दुकानात आणि रस्त्यावर तुरळक वर्दळ होती.
(1941-42 च्या आसपास) माझ्या वडिलांचं पुस्तकांचं दुकान होतं. समोर रस्त्याच्या पलीकडं किराणा मालाचं एक मोठं दुकान होतं. घरी माझा व्रात्यपणा नियंत्रणाबाहेर जात असल्याकारणानं वडील मला दुकानात न्यायचे. संध्याकाळचा साडेपाचचा सुमार. समोर दुकानात आणि रस्त्यावर तुरळक वर्दळ होती.
"ते
समोरच्या दुकानात पाहिलेस? ते आपले धोंडो केशव कर्वे आहेत!'
वडिलांनी सांगताच माझं लक्ष त्यांच्याकडं गेलं. डोक्यावर टोपी, कृश, पाठीत पोक असलेले शांत
गृहस्थ. त्यांनी तिथं धान्य खरेदी केलं. जवळपास अर्धं पोतं
भरेल इतकं. दुकानाच्या कट्ट्याच्या चार पायऱ्या उतरून रस्त्यावर आले.
कट्ट्यावरचं धान्याचं पोतं पाठीवर घेतलं आणि रस्त्याकडं
बघत पुलाच्या दिशेनं चालायला सुरवात केली. कुणी आपल्याकडं बघेल, मदत करील ही अपेक्षाच त्यांच्या
चेहऱ्यावर नव्हती. हे माझं काम आहे आणि मीच ते करायचं, इतक्या सहजतेनं ते
पोत्याचं ओझं पाठीवर घेऊन चालत होते, कर्मभूमी हिंगण्याच्या दिशेनं. त्यांची पावलं सावकाश चालत अंतर
कापत होती.
जो तेव्हा पुण्यातला सर्वाधिक उद्धट, उर्मट समजला जायचा, असा टांगेवाला धोंडो
केशवांच्या दिशेनं पुढं गेला आणि त्यानं वळून पाहिलं. धोंडो केशवांना
त्यानं ओळखलं. टांगा उभा करून तो खाली उतरला. धोंडो केशव त्याला
हातानंच पुढं जायला सांगत होते. धोंडो केशव यांच्या पायाला स्पर्श
करून तो म्हणाला, "माझ्या बापा, तुझ्या पाठीवरचं ओझं बघून मी पुढं
गेलो तर देव मला नरकात पाठवील रे. आण ते पोतं इकडं.'
पाठीवरचं पोतं घेऊन टांगेवाल्यानं ते त्याच्या टांग्यात टाकलं. धोंडो केशव
यांना हाताला धरून टांग्यात बसवलं आणि तो टांगा हिंगण्याच्या दिशेनं
निघाला. हा प्रसंग, आज 70 वर्षं झाली त्याला, जसाच्या तसा स्मरणात
राहिला आहे. जे काम मी माझं म्हणून स्वीकारलं, ते मीच करायचं, कौतुकाची, मदतीची अपेक्षा न ठेवता ते
करायचं. ज्यांच्यासाठी करायचं, त्यांच्यावर
उपकार केल्याची भावना ठेवायची नाही. प्रसंगी कृतघ्नपणासुद्धा मुकाट स्वीकारायचा. नाउमेद व्हायचं नाही.
करतो आहे ते चांगलं काम आहे. करत राहीन. माझ्या निर्णयाचा मान माझ्या
वयाला आणि प्रकृतीला राखावाच लागेल...
यातलं एक अक्षरही न बोलता, धोंडो केशव हे सांगून गेले. नुसतेच सांगून गेले, असं
नाही तर पाहणाऱ्याच्या आयुष्यभर
लक्षात राहील, असा परिणाम साधून गेले. धोंडो केशव यांच्या इतकाच तो अज्ञात टांगेवालापण जन्मभर लक्षात राहिला. पेशा कोणताही असो, सर्वप्रथम मी
जाणिवा जाग्या असलेला छान
माणूस आहे, हे त्या टांगेवाल्याइतकं
उत्कटपणे नाटका-सिनेमांत आणि
कथा-कादंबऱ्यांतदेखील कुणाला व्यक्त करता आलेलं नाही.
Comments