हे देणारे कुबेर कुठे गेले? - मंगेश तेंदुलकर (२/२)
थोडाथोडका नव्हे तर, 70 वर्षांहून अधिक काळ
जसाच्या तसा परिणाम राहावा, असा तो काही क्षणांचा
प्रसंग. मजसारख्या सामान्य इसमाला नको इतके देऊन गेलेला.
* * * *
* * * * * *
याच दरम्यानच्या काळात मला साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण केळकर
प्रथमच आणि एकदाच पाहायला मिळाले. माझ्या मित्राच्या नादाला लागून त्याच्याबरोबर
मी गायन-वादनाच्या एका क्लासला जात असे. हा प्रांत माझा नव्हता.
फक्त कुतूहल होतं. तिथं विद्यार्थ्यांसमवेत गुरुजी बसलेले असताना
कुणीतरी त्यांना सांगत आलं,
"बाहेर
तात्यासाहेब आलेत!'
गुरुजी तेव्हाच्या रिवाजाप्रमाणं डोक्यावर काळी टोपी, खांद्यावर
चवाळीचा पंचा ठेवत, धोतर गुडघ्याखाली ओढत तात्यासाहेबांना भेटायला क्लासच्या दारात गेले.
नरसिंह चिंतामण केळकर हे नाव घरी माझ्या कानावर पडत
असे. ते कोण आहेत, ते मी आज पाहत होतो. प्रसन्न चेहरा, डोक्यावर पगडी, हातात चांदीच्या
मुठीचा सोटा (काठी नव्हे), लाल काडीचं धोतर, निळा लांब कोट, उपरणं आणि पायात
तांबडे पुणेरी जोडे. स्थूल. पोट पुढं काढून उभे.
"तात्यासाहेब, आज माझ्याकडं काय काम काढलंत?' गुरुजींनी नम्रपणं विचारलं.
सुपारीचं खांड गालाच्या दिशेनं वळवून तात्यासाहेब उत्तर देत होते, "आयुष्यात जे जे करावंसं वाटलं, ते करून झालं. साहित्य झालं. समाजकारण झालं. राजकारण झालं. "केसरी'च्या संपादकपदावरूनही आता निवृत्त झालो. आता गाणं शिकायचं म्हणतो!'
"तात्यासाहेब, आज माझ्याकडं काय काम काढलंत?' गुरुजींनी नम्रपणं विचारलं.
सुपारीचं खांड गालाच्या दिशेनं वळवून तात्यासाहेब उत्तर देत होते, "आयुष्यात जे जे करावंसं वाटलं, ते करून झालं. साहित्य झालं. समाजकारण झालं. राजकारण झालं. "केसरी'च्या संपादकपदावरूनही आता निवृत्त झालो. आता गाणं शिकायचं म्हणतो!'
हे ऐकून गुरुजी स्तिमित झाले; पण ते फटकळ तोंडाचे. मनात येईल ते बंदुकीच्या गोळीसारखं धाडदिशी बोलायचे. क्षणार्धात ते तात्यासाहेबांना म्हणाले, "गाणं शिकायचं म्हणता, ते ठीक आहे; पण आता उशीर झाला!'
हे ऐकून तात्यासाहेब डिस्टर्ब झाले; पण मनातला डिस्टर्बन्स
त्यांनी सुपारीच्या खांडासोबत गिळला. म्हणाले, "मास्तर, असं पाहा...मी "केसरी'चा संपादक असलो म्हणजे
मला गाणंसुद्धा येतं, असा मी समज करून घेतला असता तर नारायण
पेठेतल्या गायकवाड वाड्यानजीकची निम्मी वस्ती उठून
निघून गेली असती. "केसरी'चा संपादक असलो, तरी गाण्याच्या प्रांतात मी
"ढ'! एवढ्यासाठी तुम्हाला विचारत आलो, गाणं शिकवता का? तर तुम्ही मला
अध्यात्म सांगायला सुरवात केलीत. उशीर झाला, वगैरे. गाण्यातले तुम्ही
गुरू म्हणजे तुम्हाला अध्यात्मपण समजले, हा स्वतःबद्दलच्या गैरसमजाचा
विपर्यास झाला. सोडून द्यावात तो. तुमच्या माहितीसाठी एवढंच सांगतो, कलेच्या प्रांतातले
प्रवास कधी एका जन्मात संपत नाहीत. जन्मजन्मांतरी
चालू राहतात. मी आता गाणं शिकलो, तर मला पुढच्या जन्मात नक्की उपयोग होईल. मग काय करता?'
गुरुजी विनम्रपणे तात्यासाहेबांना म्हणाले, "या मग उद्यापासून!'
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता ती पगडी हातात तानपुरा घेऊन सप्तकं आळवत बसलेली मी पाहिली.
Comments